om-icon Latest Updates

महाशिवरात्री उत्सव
महाशिवरात्री उत्सव
Event Description:

महाशिवरात्री म्हणजे “शिवाची महान रात्र” हा भारतीय आध्यात्मिक कॅलेंडरमधील एक महत्वाचा सोहळा आहे. ही रात्र एवढी महत्वाची का आहे आणि आपण तिचा वापर कसा करून घेऊ शकतो हे सद्गुरु आपल्याला समजावून सांगत आहेत.

भारतीय संस्कृतीत एके काळी वर्षभरात 365 सण साजरे केले जात असत. दुसर्‍या शब्दात सांगायचे म्हणजे, त्यांना वर्षातील प्रत्येक दिवस साजरा करण्यासाठी काही ना काहीतरी कारण हवे असायचे. हे 365 सण विविध कारणांसाठी आणि जीवनातील विविध उद्देश डोळ्यासमोर ठेऊन साजरे केले जात होते. विविध ऐतिहासिक घटना, विजय किंवा जीवनातील विशिष्ट परिस्थिती, उदा, पेरणी, लावणी, आणि कापणी यासाठी ते साजरे केले जात होते. प्रत्येक परिस्थितीसाठी एक उत्सव होता. परंतु महाशिवरात्रीचे महत्व वेगळेच आहे.

प्रत्येक चंद्र महिन्यातील 14 वा दिवस किंवा प्रतिपदेच्या आधीचा दिवस शिवरात्री म्हणून ओळखला जातो. वर्षभर येणार्‍या बारा शिवरात्रींमध्ये फेब्रुवारी-मार्च मध्ये येणार्‍या महाशिवरात्रीला सर्वात अधिक आध्यात्मिक महत्व आहे. या रात्री पृथ्वीच्या उत्तर गोलार्धाची स्थिती अशी असते की मनुष्यात नैसर्गिक ऊर्जेचा उद्रेक होतो. या दिवशी निसर्ग एखाद्या व्यक्तीला त्याच्या आध्यात्मिक शिखरावर ढकलत असतो. याचा वापर करून घेण्यासाठी, या संस्कृतीमध्ये आपण रात्रभर सुरू असणारा उत्सव साजरा करायला सुरुवात केली. नैसर्गिक ऊर्जेच्या या उद्रेकाला योग्य दिशा देण्यासाठी, रात्रभर सुरू असणार्‍या या उत्सवातील प्राथमिक आवश्यकता म्हणजे आपण आपल्या पाठीचा कणा ताठ ठेवून संपूर्ण रात्र न झोपता, जागे राहणे.

अध्यात्माच्या मार्गावर असणार्‍या व्यक्तींसाठी महाशिवरात्र अतिशय महत्वाची आहे. कौटुंबिक व्यक्ती, तसेच जगातील महत्वाकांक्षी लोकांसाठीसुद्धा ही अतिशय महत्वाची आहे. कुटुंबात रममाण होणार्‍या व्यक्ती हा दिवस शंकराच्या लग्नाचा वाढदिवस म्हणून साजरा करतात. जी लोकं अतिशय महत्वाकांक्षी आहेत ते हा दिवस शिवाने त्याच्या सर्व शत्रुंवर मात केली म्हणून साजरा करतात.

परंतु योगी व्यक्तींसाठी, हा दिवस म्हणजे शिव कैलास पर्वताशी एकरूप झाले तो दिवस आहे. ते पर्वतासारखेच बनले – अतिशय स्थिर. योग परंपरेत, शिव देव म्हणून पूजले जात नाही तर त्यांना आदिगुरु, म्हणजे ज्यांच्यापासून योग विज्ञान उगम पावले ते प्रथम गुरु असे मानले जाते. हजारो वर्षे ध्यान केल्यानंतर एके दिवशी ते अत्यंत स्थिर बनले. तो महाशिवरात्रीचा दिवस आहे. त्यांच्यामधील सर्व हालचाल बंद झाली व ते संपूर्णतः स्थिर झाले त्यामुळे योगी महाशिवरात्रीकडे स्थैर्याची रात्र या दृष्टीने पाहतात.

समजुती बाजूला ठेवून दिल्या तरीसुद्धा, योग परंपरेत हा दिवस आणि रात्र महत्वाची मानली जातो याचे कारण हा दिवस अध्यात्माची ओढ असणार्‍या व्यक्तींना प्रचंड संधी उपलब्ध करून देतो. आधुनिक विज्ञान अनेक टप्प्यांमधून पुढे गेलेले आहे आणि आज या निष्कर्षापर्यन्त पोहोचलेले आहे की ज्याला तुम्ही जीवन असे म्हणता, तुमच्या अस्तित्वाबद्दल माहिती असणारी प्रत्येक गोष्ट, तुम्हाला विश्व आणि आकाशगंगा म्हणून माहिती असणारी गोष्ट, या सर्व गोष्टी एकच आहेत आणि त्या लक्षावधी मार्गांनी प्रकाशित होतात हे आज सिद्ध झालेले आहे.

प्रत्येक योगीमध्ये हे वैज्ञानिक सत्य म्हणजे अनुभवात्मक सत्यता आहे. योगी या शब्दाचा अर्थ ज्याला या एकरूपतेचा साक्षात्कार झालेला आहे अशी व्यक्ती. जेंव्हा मी “योग” असे म्हणतो, तेंव्हा मी कोणत्याही विशिष्ट पद्धतीविषयी बोलत नाही. अथांगतेची माहिती करून घेण्यासाठी उत्सुक असणे, अस्तित्वातील एकत्व जाणून घेण्याची उत्सुकता म्हणजे योग. याचा अनुभव घेण्याची संधी महाशिवरात्रीची रात्र तुम्हाला उपलब्ध करून देते.